इंडिया दर्पण आनलाईन डेस्क –
विराट कोहलीच्या वाढदिवसाला त्याने सचिनच्या ४९ विक्रमी शतकांची बरोबरी तर साधलीच शिवाय या विश्वचषकात बलाढ्य समजल्या जात असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा २४३ धावांनी एक भला मोठा पराभव करून भारतीय चाहत्यांना वाढदिवसाचे रिटर्न गिफ्ट देखील दिले. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स वर खेळला गेलेला हा सामना फक्त आणि फक्त विराट कोहलीचाच सामना होता. त्याच्या ३५ व्या वाढदिवसाला विराट वन-डे सामन्यातील सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी साधणार असे अंदाज काही दिवसांपुर्वी लावले गेले होते. विराटचा सध्याचा फॉर्म बघता हे अंदाज चुकीचे नव्हतेच आणि विराटने देखील ते अंदाज खरे करून दाखवले.
संपूर्ण विश्वचषकात प्रथम फलंदाजी करून एक मोठी धावसंख्या उभारण्यात माहिर असलेल्या द. आफ्रिकेचा कर्णधार आज टॉस हरला आणि तिथेच सामना देखील त्यांच्या हातातून गेला. रोहितने मुत्सद्दीपणा दाखवित प्रथम फलंदाजी घेतली आणि रोहितने सुरूवात देखील धडाक्यात करून दिली. २४ चेंडूत तो ४० धावा करून बाद झाला लवकर बाद झाला खरा. परंतु या २४ चेंडूत त्याने द. आफ्रिकेच्या गोलंदाजीची धार बोथट करून टाकली. त्यानंतर विराटने श्रेयस अय्यरच्या मदतीने एक मोठी भागीदारी रचली आणि ५० षटकात ५ बाद ३२६ धावा करून द. आफ्रिकेला एक मोठे आव्हान दिले. विराट १०१ या धावसख्ंयेवर नाबाद राहीला. श्रेयसने बहुमूल्य ७७ धावा करून आपली योग्यता या सामन्यातही शाबीत केली. सुर्यकुमारच्या धुमधडाक्यातील २२ आणि रविंद्र जाडेजाच्या २९ धावा यामुळे भारताला एक मोठे आव्हान उभे करता आले.
परंतु, ज्या द. आफ्रिका संघाने या विश्वचषकात मोठी धावसंख्या करण्याचा सपाटा लावला आहे त्या द. आफ्रिकेच्या संघाला या सामन्यात विजयाची समसमान संधी होती. मात्र अपेक्षेप्रमाणे कोलकात्याच्या खेळपट्टीवर रविंद्र जाडेजाची फिरकी तुफान चालली आणि त्याने ३३ धावात ५ बळी घेवून द.आफ्रिकेला सर्वबाद ८३ या विश्वचषकातील द. आफ्रिकेच्या आत्तापर्यंतच्या सर्वात कमी धावसंख्येवर गुंडाळले. कुलदीपने २ आणि सातत्याने विकेटस् घेत आलेल्या मोहम्मद शामीने २ बळी घेवून भारताच्या विजयात हातभार लावला. या विजयामुळे भारतीय संघाची विजयी घोडदौड या विश्वचषकात आजही अबाधित राहिली आहे.
उद्या बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात दिल्लीमध्ये सामना होईल.