नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने २०२२ पासून सुपर ५० उपक्रम हा राबवण्यात आहे. सुपर ५० उपक्रमांतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनुसुचीत जाती व अनुसूचीत जमाती, इतर मागासवर्गीय, दिव्यांग, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जेईई (JEE), नीट (NEET) या परीक्षांकरिता निवासी स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते.
या उपक्रमांतर्गत सन २०२४ या वर्षात सुपर ५० उपक्रमात सहभागी होण्यासाठी दि. २१ जुलै रोजी आयोजित निवड परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी ७ हजार ६५४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, यापैकी ५ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल प्राप्त झाला असून नाशिक जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर सदर निकाल जाहीर करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी दिली.
निकालानंतर प्रवर्गनिहाय पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाणार असून अंतिम निवड यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. सुपर ५० उपक्रमांतर्गत सन २०२२ मध्ये प्रवेश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचा इयत्ता १२वी चा निकाल १०० टक्के लागला असून यातील २२ विद्यार्थ्यांनी JEE Mains परीक्षेत यश संपादन केले आहे. या २२ विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांनी JEE Advance परीक्षा उत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांचे आयआयटी मध्ये जाण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. निकाल बसण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करावा : https://zpnashik.maharashtra.gov.in/