इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाने मे. नाशिक टि कंपनी, बाजार पटांगण, नाशिक कळवण रोड, दिंडोरी, ता. दिंडोरी, जि. नाशिक या ठिकाणी धाड टाकली. याठिकाणी घाउक चहा पावडर विक्रीचा व्यवसाय हा सुरु असल्याचे आढळून आले. तपासणीअंती सदर पेढीस चहा पावडर साठवणुक तथा विक्रीबाबतचा अन्न सुरक्षा मानके कायदयाअंतर्गत परवाना नसल्याचे आढळून आले. तसेच त्याठिकाणी विक्रीसाठी साठविलेल्या चहा पावडरच्या पोत्यांवरील लेबलवर कायदयानुसार आवश्यक असणारे मजकुर नसल्याने सदर अन्नपदार्थ हा मिथ्याछाप या सदरात मोडत असल्याने अन्न सुरक्षा अधिकारी यांनी वरील साठ्यातून दोन नमुने विश्लेषणासाठी घेवून उर्वरित साठा ५६० किलो, २ लाख १ हजार ६०० इतका जप्त केला व सदर पेढीस परवाना नसल्याने व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
सदरचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले असून विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही घेण्यात येईल.सदरची कारवाई ही सह आयुक्त नाशिक विभाग उदयदत्त लोहकरे यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) विवेक पाटील व अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख व नमुना सहायकविजय पगारे या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.