सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर खड्डे पडले आहेत. यामुळे अपघाताची शक्यता आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजविण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ च्या संदर्भात झालेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने येत्या १५ऑगस्टपर्यंत खड्डे न बुजविल्यास गुन्हे दाखल करणार, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्यांवरील खड्डेही बुजवावेत. कुठेही अपघात होणार नाही, यासाठी रस्ता सुस्थितीत आणावा. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत केल्या.