नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम परिसरात एकाने पोलीसास शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करतांना टोकल्याने ही घटना घडली असून, या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात सरकारी कामास अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश रमेश गिरी (३० रा.आरटीओ जवळ पेठरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत हवालदार चंपालाल सुळे यांनी फिर्याद दिली आहे. सुळे रविवारी (दि.४) छत्रपती संभाजीनगर रोडवरील अमृतधाम चौक भागात दीप आमवस्यानिमित्त बंदोबस्तावर असतांना ही घटना घडली. रात्री नऊ च्या सुमारास ते फिक्स पॉईटवर सरकारी कर्तव्य बजावत असतांना संशयित रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरड करतांना आढळून आला.
हवालदार सुळे यांनी त्यास हटकले असता संशयितांने त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. या घटनेत सुळे यांनी परिधान केलेल्या वर्दीचे नुकसान झाले असून अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.