इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूरच्या रामनगर चौकात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे बदनामीकारक होर्डिंग लावल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष बादल राऊत आणि त्यांच्या सहका-यांसह होर्डिंग कंपनीच्या विरोधात नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या होर्डिंग मध्ये अनिल देशमुख यांच्याबद्दल वसुली बुध्दी असे लिहून त्यांना तुरुंगात दाखवण्यात आले होते.
या होर्डिंग नंतर अनिल देशमुख यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत म्हटले की, धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी! महाराष्ट्रात तुम्ही किती घाणेरडे व खालच्या थराचे राजकारण करत आहात, याचा नवीन अंक आज नागपूरच्या जनतेला पुन्हा एकदा तुमच्या कडून पाहायला मिळाला. लक्षात असू द्या…जनता जनार्दन हैं!