नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यक्रमाला नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नागपूर महानगरपालिकेत आयोजित जनसंपर्क कार्यक्रमात ना. श्री. गडकरी यांनी नागरिकांची निवेदने स्वीकारली. त्याचवेळ उपस्थित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
ना. श्री. नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम प्रथमच नागपूर महानगरपालिकेत आयोजित करण्यात आला. यावेळी माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व अजय चारठाणकर, यांची उपस्थिती होती. याशिवाय सर्व झोनचे अधिकारी देखील उपस्थित होते. नागपुरातील विविध भागातील नागरिक आपल्या अडचणी घेऊन ना. श्री. गडकरींपर्यंत पोहोचले. यावेळी त्यांनी विधानसभानिहाय नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात आली.
कुणी पाण्याची समस्या, कुणी ड्रेनेजची, तर कुणी रस्त्यांच्या समस्या घेऊन आले. समस्या सोडविण्यात कोणत्या अडचणी येत आहेत, याची माहिती गडकरींनी अधिकाऱ्यांकडून तिथेच घेतली. त्यानंतर कायदेशीर बाबी तपासून लवकरात लवकर नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे गडकरींनी अधिकाऱ्यांना सांगितले. याशिवाय नाल्यांची तसेच ड्रेनेजची साफसफाई पावसाळ्यापूर्वी झाली होती का, ज्याठिकाणी झाली नाही तिथे नागरिकांना पावसाच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागला का, याची पुन्हा एकदा शहानिशा करून घ्यावी, अशी सूचनाही ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिली.
सकाळपासूनच वाढली गर्दी
ना. श्री. गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम नागपूर महानगरपालिकेत होणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते. त्यामुळे संभाव्य गर्दी लक्षात घेता सकाळपासूनच महापालिकेत लोकांनी रांगा लावल्या. शेकडोंच्या संख्येने नागपूरकर इथे आले. यात दिव्यांग, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींचा समावेश होता. नागपूरसह दिल्ली, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश या राज्यांमधून तर महाराष्ट्रातील नांदेड, वर्धा, यवतमाळ या शहरांमधूनही लोक निवेदन घेऊन पोहोचले होते.
तात्काळ नियोजन करा
मनपाच्या दहाही झोननिहाय तत्काळ नियोजन करून नागरी समस्या सोडविण्याचे निर्देश ना. श्री. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले. शहरात सुरु असलेल्या विविध विकासकामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसामुळे घरात पाणी शिरले, रस्त्यावर पाणी तुंबून राहिले. गटार लाईन चोक झाल्यामुळे सांडपाणी बाहेर आले, रस्त्यावर खड्डे पडले अशा दीड हजाराहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व समस्यांचे मनपाच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाद्वारे झोन निहाय तपासणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही ना. श्री. गडकरी यांनी आयुक्त डॉ. चौधरी यांना दिले.