नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हनुमानवाडी भागात पायी जाणा-या तरूणाची वाट अडवित दुचाकीस्वार त्रिकुटाने धारदार चॉपरचा धाक दाखवित लुटल्याची घटना घडली. या घटनेत तरूणास दुखापत करीत भामट्यांनी खिशातील रोकडसह मोबाईल बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय शंकर गहिले (२९ रा.काकडबाग,मोरेमळा रामवाडी) या युवकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गहिले गुरूवारी (दि.१) रात्री साडे दहाच्या सुमारास कामावरून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. हनुमानवाडीतील राका लॉन्स भागातून रस्त्याने पायी जात असतांना दुचाकीवर ट्रिपलसिट आलेल्या भामट्यांनी त्याची वाट अडविली.
यावेळी एकाने धारदार चॉपरने वार करून गहिले यास जखमी केले तर दोघांनी त्यास पकडून ठेवत खिशातील तीन हजाराची रोकड व मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला. या घटनेत सुमारे तेरा हजाराचा मुद्देमाल भामट्यांनी लांबविला असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.