इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांची येरवडा जेलमधून सुटका करण्यात आली. शुक्रवारी पुणे न्यायालयाने मनोरमा खेडकर यांचा जामीन मंजुर केला होता.
१८ जुलै रोजी पुणे पोलिसांनी रायगड़ जिल्हयातून त्यांना अटक केली होती. रायगड जिल्ह्यातील हिरकणवाडीच्या हॉटेल पार्वतीमध्ये त्या लपून बसल्या होत्या. शेतकऱ्यांना धमकवल्याच्या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल होता. त्यानंतर त्या फरार झाल्या होत्या.
मनोरमा खेडकर यांनी मुळशीमधील शेतकऱ्यांना धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मनोरमा खेडकर फरार झाल्या होत्या. वर्षभरापूर्वी खेडकर कुटुंबाने पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात २५ एकर वादाची जमीन खरेदी घेतली होती. या जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्यामुळे शेजारी शेतकऱ्यांनी विरोध केला होता. त्यावेळी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या बाउन्सर अन् गुंड घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले होते. याच प्रकरणात आता त्यांना जामीन मिळाला आहे.