नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गोदाघाटावरील रामकुंड परिसरात प्रसाद खाऊ घालून भुरळ पाडत भामट्यांनी वृध्द महिलेच्या गळयातील अलंकार काढून घेतले. या घटनेत सुमारे ३५ हजाराचे दागिणे चोरट्यांनी लांबविले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजया वसंत साखरे (६५ रा. मखमलाबादरोड,क्रांतीनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. साखरे या शुक्रवारी (दि.२) सकाळच्या सुमारास नेहमीप्रमाणे गोदाघाटावर गेल्या होत्या. कपालेश्वर मंदिराच्या बाजूच्या वरद गणपती मंदिराजवळून त्या रामकुंडाच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. दोघा अनोळखी इसमांनी त्यांना गाठून आजी तुम्हाला लॉटरी लागली आहे. तुम्ही हा प्रसाद घ्या आणि बाजूला या असे म्हणत त्यांना साखरे यांना बाजूला नेत गळय़ातील दागिणे लांबविले.
प्रसाद खाल्याने साखरे यांना काही सुचत नव्हते. भुरळ आल्याचे लक्षात येताच वृध्देच्या गळयातील सोन्याचे मंगळसुत्र व पोत असा सुमारे ३५ हजाराचा ऐवज काढून घेत भामट्यांनी पोबारा केला. अधिक तपास उफनिरीक्षक गायकवाड करीत आहेत.