नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिक्षा प्रवासात एका नोकरदारास लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. प्रवाशी मद्याच्या नशेत असल्याची संधी साधत चालकासह त्याच्या साथीदाराने नोकरदारास दमदाटी करीत हातातील हिरेजडीत सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेत लॅपटॉप, मोबाईल घड्याळ व रोकड असा सुमारे ८१ हजाराचा ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोस्तूभ शिवाजीराव खैरणार (४६ रा.शिवाजीनगर,सातपूर ) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. खैरणार नोकरदार असून शुक्रवारी (दि.२) ते मद्याच्या नशेत रिक्षा प्रवास करीत असतांना ही घटना घडली. ठक्कर बाजार येथून ते एक प्रवासी असलेल्या रिक्षात बसले होते. शिवाजीनगर येथे जाण्यासाठी ते रिक्षा प्रवास करीत असतांना चालकासह त्या प्रवाश्याने दमदाटी करीत त्यांना लुटले.
या घटनेत खैरणार यांच्या हातातील हिरेजडीत सोन्याची अंगठी व पाकिट बळजबरीने काढून घेण्यात आले. तर बॅगेतील लॅपटॉप व अॅपलचा मोबाईल हिसकावून घेत भामट्यांनी त्यांना रिक्षातून उतरवून देत पोबारा केला. ही घटना औद्योगीक वसाहतीत घडली. अधिक तपास हवालदार झिरवाळ करीत आहेत.