मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेम याला गुरुवारी मध्यरात्री नाशिकहून कडेकोट बंदोबस्तात दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यासाठी रेल्वेने नेण्यात आले होते. पण, सुनावणी पुढे ढकलल्यामुळे त्याला पुन्हा दिल्लीहून मनमाड येथे कर्नाटक एक्सप्रेसने आणण्यात आले. त्यावेळेस मनमाड रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. त्यानंतर त्याला मनमाडहून पुन्हा नाशिक कारागृहामध्ये पोलिस वाहनांमधून आणण्यात आले.
अबू सालेम महिनाभरापूर्वी तळोजा कारागृहातून नाशिकरोड कारागृहात आण्यात आले होते. तेव्हापासून तो नाशिक कारागृहात आहे. दिल्लीतील न्यायालयाने सालेमला हजर करायचे असल्यामुळे कारागृह प्रशासनाने गुरुवारी रात्री नाशिक शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यावेळी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाबाहेर आणि रेल्वे स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आता पुन्हा दिल्लीहून आणतांनाही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.