गौतम संचेती, इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात माजी आमदार वसंत गीते यांना गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ब्रेक घेण्याची चुक नडणार आहे. गेल्या वेळेस ते भाजपमध्ये असल्यामुळे त्यांनी निवडणूक लढवली नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर या निवडणुकीत चांगलेच आव्हान उभे आहे. महाविकास आघाडीने ही जागा ठाकरे गटाला सोडली तर त्यांना पुन्हा निवडणूक लढवता येणार आहे. नाहीतर यावेळी सुध्दा त्यांना ब्रेक घ्यावा लागणार आहे.
वसंत गीते यांनी शिवसेना, मनसे, भाजप असा प्रवास करत पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. खरं तर त्यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. शिवसेनेचा पहिला महापौर असलेले गिते पुढे मनसेकडून २००९ ला आमदार झाले. पण, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. येथेही त्यांनी तिकीटासाठी प्रयत्न केले. पण, भाजपने विद्यमान आमदार असलेल्या प्रा. देवयानी फरांदे यांना संधी दिली. त्यावेळेस इतर पक्षांकडून गीते यांना उमेदवारी विचारण्यात आली. पण, त्यांनी भाजपमध्ये बंड न करता ब्रेक घेतला. आता हीच चुक त्यांना नडणार आहे. त्यावेळेस भाजप विरोधात काँग्रेसने डॅा. हेमलता पाटील यांना उमेदवारी दिली. फारशी तयारी नसतांना त्यांनी २८ हजार ३९८ मते घेतली. त्यामुळे काँग्रेसकडून या जागेसाठी आता मोठा दावा केला आहे.
प्रयत्न केले तर अवघडही नाही…
वसंत गीते यांनी ब्रेक घेण्याची चुक तर केली. पण, त्याबरोबरच पक्ष बदल केल्यामुळे त्याचाही काहीसा फटका त्यांना बसणार आहे. ठाकरे गटात पुन्हा गेल्यानंतर ते सक्रीय झाले असले तरी पूर्वीच्या वसंत गीतेंचा दबदबा काहीसा कमी झाला आहे. त्यात त्यांनी सहकार क्षेत्राला अधिक महत्त्व देऊन आपले लक्ष नामकोत ठेवल्यामुळे मतदारांशी अगोदर असलेल्या संपर्कातही फरक पडला आहे. त्यामुळे गीते यांना नाशिक मध्य विधानसभेची निवडणूक आता इतकी सोपी नाही. पण, प्रयत्न केले तर अवघडही नाही…
तिन्ही पक्षाचा दावा
खरं तर लोकसभेच्या निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी बाजी मारल्यानंतर महाविकास आघाडीचे मनोबल वाढले आहे. त्यात नाशिक मध्य विधानसभा मतदार संघात आघाडी घेतल्यामुळे आता या ठिकाणी तिन्ही पक्ष दावा करत आहे. त्यात शिवसेना व काँग्रेसचा दावा प्रबळ आहे. भाजपच्या विद्यमान आमदार देवयांनी फरांदे यांनी २०१४ व २०१९ च्या निवडणुका मोठ्या फरकाने जिंकल्या आहे. पण, लोकसभेत या मतदार संघात मतदारांनी महाविकास आघाडीला अधिक पसंती दिल्यामुळे त्यांच्यासमोर आता आव्हान आहे. पण, हे आव्हान असले तरी फरांदे यांनी हॅट्रिक करण्यासाठी जोरदार मोहिम आखली असून त्या आतापासूनच प्रचाराला लागल्या आहे.