नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बहिणीस त्रास देवू नको असा सल्ला दिल्याने एकाने महिलेवर पिस्तूल रोखत दोघा बहिणींना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जेलरोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय जयद्रथ काकडे (३२ रा.रोकडोबावाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत सिडकोतील संभाजी स्टेडिअम भागात राहणा-या २९ वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या बहिणीशी संशयिताचे प्रेमसंबध आहेत. त्यातून ही घटना घडली. महिला गुरूवारी (दि.१) जेलरोड भागात गेली होती.
जुना साईखेडारोड वरिल सैलानी बाबा रिक्षा थांबा येथे तिला संशयित भेटला. यावेळी त्याने आपल्या प्रेयसीबाबत तक्रार केली असता महिलेने बहिणीला त्रास देवू नको असा सल्ला दिल्याने संशयिताने थेट कमरेला लावलेला पिस्तूल काढून महिलेवर रोखला. यावेळी त्याने दोन्ही बहिणींना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार घेगडमल करीत आहेत.