नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कांदा आयात न करणे आणि निर्यात शुल्क पुर्ण रद्द करण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. कळवण येथे विविध विकास कामाच्या शुभारंभासाठी अजित पवार आले असता यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे व नाशिक जिल्हाध्यक्ष जयदिप भदाणे यांनी दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकरी आपल्या माध्यमातून केंद्र सरकारकडे मागणी करत आहोत की केंद्र सरकारने अफगाणिस्तान किंवा इतर कोणत्याही देशातून कांद्याची आयात होणार नाही. यासाठी कांदा आयात करण्यावर शंभर टक्के बंदी घालावी.
तसेच देशात व महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक असल्याने आणि नवीन कांदा पेरणीही मोठ्या प्रमाणात झाली असल्याने अजून कांदा आवक वाढणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लागू केलेले ४० टक्के निर्यात शुल्क आणि ५५० डॉलरचे किमान निर्यात मूल्य त्वरित हटवावे. तसेच राज्य सरकारने मागील वर्षी जाहीर केलेले कांद्याचे अनुदान अजुनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाही. तेही अनुदान एकरकमी शेतकऱ्यांना अदा करावे.
अन्यथा महाराष्ट्र राज्यातून देशांतर्गत होणारा कांदा पुरवठा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून पूर्णपणे रोखला जाईल कुठल्याही बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांदा पाठवला जाणार नाही. तसेच केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र स्वरूपाचे आंदोलने करेल असा इशाराही या निवदेनातून देण्यात आला.