इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई पोलिस दलातील बडतर्फ अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीए मार्फत पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप केला. त्यात त्यांनी याविषयीची नार्कोटेस्टची तयारी दाखवली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले नीट ऐका! सचिन वाझे म्हणतोय…सीबीआई के पास प्रूफ है, मैंने भी फडणवीस साहब को लेटर लिखा है”!
फडणवीस काय सीबीआयचे डायरेक्टर आहेत का ? जनतेने समजून घ्यावं, महाराष्ट्रात सीबीआयचे कटकारस्थान रचणारा कोण आहे? वाझेचा बोलावता धनी कोण आहे?
तर दुसरीकडे भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देशमुख यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला! असे सांगत त्यांनी जोरदार हल्ला केला आहे.वाघ म्हणाल्या की, सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. याचे पुरावे गृहखात्याकडे त्याने दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे. आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी.
निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे शरद पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते, हे जनता विसरलेली नाही. सचिन वाझेविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती. सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का? असे बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते, हे देखील सर्वश्रुत आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गॅंगची अधिक माहिती देतील का…? याची आम्ही वाट पहातोय असेही त्या म्हणाल्या.