इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लाडकी बहिण योजना विरोधी पक्षातील काही सावत्र भावांच्या डोळ्यात खुपू लागली आहे. योजनेसाठी कोर्टात जायचे आणि स्टे घ्यायचा असा प्रयत्न विरोधकांनी केला आहे मात्र लाडक्या बहिणींला कोर्ट न्याय देईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. कपटी आणि सावत्र भावांपासून लाडक्या बहिणींनी सावध राहावे. या योजनेत सर्व जातीपातीच्या महिलांना लाभ मिळणार आहेत. अर्थसंकल्पात सरकारने या योजनेसाठी ४६००० कोटींची तरतूद केली आहे असेही स्पष्ट केले.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला सशक्तीकरण योजना आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी जमलेल्या लाखो बहिणींना संबोधित केले.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्रा.रमेश बोरनारे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महानगर पालिका आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना उपस्थित होते.
राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. या विविध योजनांमधून महिलांना लाभ मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यात महिलांना तीन सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना, लेक लाडकी योजना, मुलींना संपूर्ण उच्च शिक्षण मोफत देणारी योजना, महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट देण्याची योजना, महिला बचतगटांना वाढीव भाग भांडवल अशा अनेक योजनांचा समावेश असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले.
यावेळी बोलताना, मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्यासाठी सरकारने एक वर्षापासून नियोजन केले असून ही योजना फक्त निवडणुकीपुरती नाही तर कायमस्वरूपी चालू राहणार असल्याची ग्वाही दिली. विरोधकांनी याबाबत कितीही आकांडतांडव केले तरी ही योजना सुरु राहणारच असे निक्षून सांगितले. येत्या रक्षाबंधनापूर्वी या योजनेचे पहिले २ हप्ते महिला भगिनींच्या खात्यात डीबीटी द्वारे देण्यात येतील असे यावेळी स्पष्ट केले.