नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रस्त्याने पायी जाणा-या महिलेस धारदार कोयत्याचा धाक दाखवित दुचाकीस्वार भामट्यानी सोनसाखळी लांबविल्याची घटना विठ्ठल रूख्मिणी मंदिर परिसरात घडली. या घटनेत १६ ग्रॅम वजनाची सुमारे १ लाख १० हजार रूपये किमतीची सोनसाखळी भामट्यांनी पळविली असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती दिलीप चव्हाण (५८ रा.परबनगर,इंदिरानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चव्हाण या बुधवारी (दि.३१) नेहमीप्रमाणे परिसरातील विठ्ठल रूख्मिणी मंदिरात देवदर्शनासाठी जात असतांना ही घटना घडली. परबनगर येथून त्या इंदिरानगरच्या दिशेने रस्त्याने पायी जात असतांना मंदिर परिसरात एमएच १५ एचएस १०७६ वरील दुचाकीस्वारानी त्यांची वाट अडविली.
यावेळी पाठीमागे बसलेल्या तरूणाने कमरेला लावलेला धारदार कोयता काढून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत गळयातील १६ ग्रॅम वजनाची व सुमारे १ लाख १० हजार रूपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून भामट्यांनी पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक सोनार करीत आहेत.