नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी राज्ये आणि महानगरपालिकांना डेंग्यूची साथ येऊ नये यासाठी सावधानता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. “संबंधित भागधारक जसे की नागरी विकास मंत्रालय, राज्ये, महानगरपालिका आणि स्थानिक स्वशासन संस्था यांनी देशात डेंग्यूला प्रतिबंध व डेंग्यूच्या प्रकरणांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सहयोगाने आणि अनुक्रमाने कार्यरत राहणे महत्त्वाचे आहे,” असे त्यांनी उच्चस्तरीय आंतर मंत्रिगटाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून सांगितले. पावसाळा सुरू झाल्यावर वाढू लागलेली डेंग्यूची लागण लक्षात घेत देशातील सर्वाधिक प्रभावित 9 राज्यांमधील स्थिती आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या डेंग्यूला प्रतिबंध, धारकता व व्यवस्थापनाबाबत सज्जतेचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष व दूरदृश्य अशा दोन्ही माध्यमांतून ही बैठक आज घेण्यात आली. बैठकीत गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयासह दिल्ली, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तमिळ नाडू, तेलंगण, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचे सचिव आणि उच्चस्तरीय अधिकारी सहभागी झाले होते. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, हैदराबाद आणि मुंबईस एकूण 18 महानगरपालिकांनी या बैठकीत दूरदृश्य माध्यमातून भाग घेतला. डेंग्यू्च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद कर्नाटक, केरळ, तमिळ नाडू आणि महाराष्ट्रात झाली आहे.
ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांमध्ये डेंग्यूची लागण सर्वोच्च प्रमाण गाठते हे लक्षात घेऊन पावसाळा येण्याआधी पूर्वनियोजित पावले उचलण्याची आणि सार्वजनिक आरोग्य उपाययोजना करण्याची गरज अपूर्व चंद्र यांनी अधोरेखित केली. गेल्या चार वर्षांत प्रत्येक वर्षागणिक डेंग्यूच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. एरवी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ऑक्टोबरमध्ये कळस गाठत असली तरी यंदा 31 जुलै 2024 रोजी ही संख्या गेल्या वर्षी या सुमारास असलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत जवळपास 50 टक्क्यांहून अधिक आहे, असे त्यांनी सांगितले.
सर्वोच्च रूग्णसंख्येच्या आगामी काळासाठी आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले. गेल्या चार वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी वेळीच, सहयोगाने आणि लक्ष्यित प्रयत्न केल्यामुळे डेंग्यूमुळे मृत्यू होण्याच्या दरात घट झाली असून तो 1996 मधील 3.3% वरून 2023 मध्ये 0.17% वर आला आहे, असे आरोग्य सचिव म्हणाले.
डेंग्यूच्या रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये परिणामकारक व्यवस्थापन सज्ज ठेवावे, असा सल्ला अपूर्व चंद्र यांनी राज्यांना दिला. डेंग्यूचे ‘हॉटस्पॉट्स’ ओळखणे, विषाणूवाहकांच्या वाढत्या संख्येवर लक्ष ठेवणे, प्रतिबंधात्मक उपाय अंमलात आणण्यासाठी डेंग्यूच्या प्रकरणांचे ‘जिओ-टॅगिंग’ करण्यास त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “मृत्यूदर कमी करण्यासाठी रक्तपट्टिका आणि रुग्णालयात आवश्यक साधनसामग्रीची आरोग्य विभागातील उपलब्धता पुरेशी राहील याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे.” डेंग्यूवर मात करण्यासाठी राज्यांना सर्व प्रकारे मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आणि आवश्यक मदतीसाठी आपापले प्रस्ताव मंत्रालयाकडे पाठवण्यास सांगितले.