इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
करदात्यांनी आणि कर व्यावसायिकांनी वेळेत अनुपालन केल्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्रे (आयटीआर) दाखल करण्यात मोठी वाढ झाली असून 31 जुलै 2024 पर्यंत विक्रमी संख्येने प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल झाली आहेत. मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी 31 जुलै 2024 पर्यंत 7.28 कोटींहून अधिक प्राप्तिकर विवरणपत्रे दाखल झाली असून मूल्यांकन वर्ष 2023-24 साठी 31 जुलै 2023 पर्यंत दाखल केलेल्या (6.77 कोटी) एकूण प्राप्तिकर विवरणपत्रांपेक्षा ही संख्या 7.5% अधिक आहे.
यावर्षी करदात्यांनी मोठ्या संख्येने नवीन कर प्रणालीची निवड केली आहे. मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी दाखल एकूण 7.28 कोटी आयटीआर पैकी 5.27 आयटीआर नवीन कर प्रणालीमध्ये दाखल करण्यात आले आहेत तर जुन्या कर प्रणालीमध्ये 2.01 कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. अशाप्रकारे, सुमारे 72% करदात्यांनी नवीन कर प्रणालीची निवड केली आहे, तर 28% करदाते जुन्या कर प्रणालीमध्ये कायम आहेत.
31 जुलै, 2024 रोजी (पगारदार करदाते आणि इतर नॉन-टॅक्स ऑडिट केसेससाठी अंतिम मुदत ) सर्वाधिक म्हणजेच एकाच दिवसात 69.92 लाखांहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले. ई-फायलिंग पोर्टलने त्याचे निरीक्षण केले असता 31.07.2024 रोजी संध्याकाळी 7:00 ते 8:00 दरम्यान आयटीआर दाखल करण्याचा ताशी दर सर्वाधिक 5.07 लाख इतका होता. तर आयटीआर दाखल करण्याचा सर्वोच्च प्रति सेकंद दर 917 (17.07.2024, 08:13:54 am) आणि आयटीआर दाखल करण्याचा सर्वोच्च प्रति मिनिट दर 9,367 (31.07.2024, 08:08 pm) होता.
विभागाकडे 31.07.2024 पर्यंत प्रथमच विवरणपत्र दाखल करणाऱ्यांकडून 58.57 लाख आयटीआर प्राप्त झाले, ज्यावरून करदात्यांच्या संख्या वाढत असल्याचे स्पष्ट होते. इतिहासात प्रथमच , आयटीआर (ITR-1, ITR-2, ITR-4, ITR-6) आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 01.04.2024 रोजी ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध करण्यात आले. ITR-3 आणि ITR-5 देखील आधीच्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत लवकर जारी करण्यात आले होते. जुन्या आणि नवीन कर पद्धतींबद्दल करदात्यांना शिक्षित करण्यावर प्रामुख्याने भर देण्यात आला. वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्यासंबंधी शैक्षणिक व्हिडिओ ई-फायलिंग पोर्टलवर डिझाइन आणि अपलोड करण्यात आले.
करदात्यांना त्यांचे आयटीआर लवकर दाखल करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सोशल मीडियावर केंद्रित प्रचार मोहीम राबवण्यात आली. त्याचबरोबर , वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर अनोख्या सर्जनशील मोहिमाही राबवण्यात आल्या. इंग्रजी आणि हिंदी व्यतिरिक्त 12 स्थानिक भाषांमधील माहितीपूर्ण व्हिडिओ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले. आऊटडोअर मोहिमाही राबवण्यात आल्या. अशा एकत्रित प्रयत्नांचे फलदायी परिणाम दाखल विवरणपत्रांच्या वाढलेल्या संख्येतून दिसून आले. गेल्या काही वर्षांतील आयटीआर फाइलिंगचा खालील डेटा याचे समर्थन करतो:
आर्थिक वर्ष 2024-25 साठी भरलेल्या एकूण 7.28 कोटी आयटीआरपैकी 45.77% आयटीआर हे आयटीआर-1 (3.34 कोटी), 14.93% हे आयटीआर-2 (1.09 कोटी), 12.50% हे आयटीआर-3 (91.10 lakh), 25.77% हे आयटीआर-4 (1.88 कोटी) आणि 1.03% हे आयटीआर-5 ते आयटीआर-7 (7.48 लाख) आहेत. 43.82 टक्क्यांहून अधिक आयटीआर ई-फायलिंग पोर्टल या ऑनलाईन सुविधेमार्फत भरण्यात आले आहेत; तर उर्वरित आयटीआर ऑफलाईन भरले आहेत.
आयटीआर भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वी पोर्टलवर येणाऱ्या करदात्यांच्या मोठ्या संख्येचे यशस्वी व्यवस्थापन ई-फायलिंग संकेतस्थळाने यशस्वीरित्या केले. 31 जुलै 2024 या एका दिवसात पोर्टलवर लॉग-इन करणाऱ्यांची संख्या 3.2 कोटी एवढी होती.
ई-पडताळणीची प्रक्रिया आयटीआरच्या संस्करणाला सुरुवात करण्यासाठी व परतावा असल्यास तो देण्यासाठी महत्त्वाची ठरते. उत्साहजनक बाब अशी की 6.2 कोटी आयटीआरची ई-पडताळणी झाली असून त्यापैकी 5.81 कोटींपेक्षा जास्त (93.56%) ई-पडताळणी आधाराधारित ओटीपीमार्फत झाली आहे. ई-पडताळणी झालेल्या आयटीआरपैकी वर्ष 2024-25 साठीच्या 2.96 कोटींपेक्षा जास्त (43.34%) आयटीआरचे संस्करण 31 जुलै 2024 पर्यंत पूर्ण झाले आहे. वर्ष 2024-25 साठी 91.94 लाखांहून अधिक चालान टिन 2.0 भरणा प्रणालीमार्फत जुलै 2024 मध्ये प्राप्त झाली असून 1 एप्रिल 2024 पासून 2024-25 साठी टिन 2.0 प्रणालीमार्फत प्राप्त झालेल्या चलनांची संख्या 1.64 कोटी इतकी आहे.
ई-फायलिंग संदर्भात मदतीसाठी असलेल्या चमूने करदात्यांच्या सुमारे 10.64 लाख प्रश्नांची हाताळणी 31 जुलै 2024 पर्यंत वर्षभराच्या कालावधीत करून करदात्यांना अंतिम तारखेनजीक सक्रीय मदत दिली. ही मदत दूरध्वनी, लाइव चॅट्स, वेबएक्स आणि को-ब्राउझिंग सत्रांमार्फत पुरवण्यात आली.
या चमूने कर विभागाच्या X (ट्विटर) खात्यावर आलेल्या शंकाचे निरसन ऑनलाईन प्रतिसाद व्यवस्थापनाद्वारे करदाते व भागीदारांपर्यंत पोहोचून केले असून त्यांना प्रत्यक्ष भरणा करताना येणाऱ्या विविध अडचणी त्या त्या वेळी दूर करून सहाय्य केले आहे. या चमूने 1 एप्रिल ते 31 जुलै 2024 या काळात 1.07लाख ईमेल हाताळले असून त्यामार्फत आलेल्या 99.97% प्रश्नांना यशस्वीरित्या उत्तरे दिली आहेत.
कर व्यावसायिक आणि करदात्यांनी आयटीआर व अर्ज भरण्याची आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल विभागाने त्यांचे आभार मानले आहेत. आयटीआर भरल्यावर पडताळणी करणे राहिले असल्यास आयटीआर भरल्यापासून 30 दिवसांच्या आत त्यांची पडताळणी करण्याचे आवाहन विभागाने करदात्यांना केले आहे.
कोणत्याही कारणाने दिलेल्या मुदतीच्या आत करदात्यांची आयटीआर भरण्याची प्रक्रिया राहिली असेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचे कळकळीचे आवाहन विभागाने करदात्यांना केले आहे.