नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नव्याने सुरू झालेल्या आधुनिक मेळा बसस्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून गुरूवारी (दि.१) मुंबई पोलीस दलात कार्यरत महिलेसह अन्य दोघींना चोरट्यांनी चांगलाच हिसका दाखविला. बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधून भामट्यांनी सदर महिलांचे अलंकार व मोबाईल असा सुमारे ९० हजाराचा ऐवज लांबविला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मात्र चोरीचा एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदुबाई विजय जाधव (रा.कुंदेवाडी ता.निफाड) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. जाधव या शहरात आल्या होत्या. गुरूवारी दुपारी परतीच्या प्रवासासाठी त्या मेळा बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडना घडली. लासलगाव बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. याच दरम्यान मुंबई पोलीस दलात कार्यरत तेजश्री माने यांच्या पर्समधून भामट्यांनी मोबाईल चोरून नेला. या मोबाईलच्या कव्हरमध्ये मुंबई शहर पोलीस दलाचे ओळखपत्र होते. तर लक्ष्मीबाई सोनवणे यांच्या गळयातील दीड तोळे वजनाचे डोरले असा सुमारे ९० हजाराचा ऐवज चोरट्यांनी पळविले.
दरम्यान सीसीटिव्ही यंत्रणेच्या निगराणीखाली असलेल्या मेळा बसस्थानकात चोरीचे प्रकार वाढले असून पोलीसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाश्यांकडून होवू लागली आहे. अधिक तपास हवालदार लोंढे करीत आहेत.