नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या अहवा – छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्ग क्रमांक २६ वर नांदगावच्या चाळीसगाव फाटा ते नाशिक जिल्ह्याची हद्द असलेल्या तळवाडा घाटापर्यंत रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वारंवार मागणी करूनही खड्डे बुजविण्यात येत नसल्याने प्रहार शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न अवस्थेत रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला. सुमारे दीड तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे दुतर्फा वहातुक ठप्प झाली होती. अखेर तात्पुरते खड्डे बुजविण्यास सुरवात करण्यात आली व पाऊस संपल्यानंतर डांबरीकरण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता आंदोलन मागे घेण्यात आले.