नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शासकिय योजनांचा लाभ मिळवुण देण्याचे आमिष दाखवून एका संस्थेच्या माध्यमातून असंघटीत महिला कामगारांची मोठ्या प्रमाणात फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत फॉर्म फीच्या नावाखाली महिलांकडून प्रत्येकी ६५० रूपये असे लाखो रूपये उकळण्यात आले असून, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तात्काळ सदर संस्थेच्या महिला अध्यक्षासह अन्य एकास अटक केली आहे.
मंगला सतिश भंडारी (रा.गुलमोहर कॉलनी आनंदनगर) व संजय संभाजी भालेराव (रा.पाथर्डी फाटा,गौवळाणेरोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत चैताली गवांदे (रा.अरिंगळे मळा,ना.रोड) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित भंडारी या महिलेची समाजीक संस्था असून नाशिक पुणा मार्गावरील दत्त मंदिर सिग्नल भागात आपले कार्यालय थाटून तिने महिलांना गंडा घातला आहे.
साई प्लाझा या इमारतीत असलेल्या भंडारी ग्लोबल सर्र्व्हीस प्रा.लि. या संस्थेच्या माध्यमातून कामगार कल्याण मंडळाचे काम केले जात असल्याचे भासवून घरकाम करणा-या महिलांना घरकुल, नभांडी पेन्शन व इतर योजनांचे आमिष दाखविले जात होते. संशयितांसह त्याच्या साथीदाराकडून त्याबाबत फॉर्म फीच्या नावाखाली राजरोसपणे प्रति महिला ६५० रूपये उकळले जात होते. या योजनेस शहरातील असंख्य महिला बळी पडल्या असून तक्रारदार गवांदे यांनीही गेल्या फेब्रुवारी महिन्यात फॉर्म भरला होता. मात्र सहा महिने उलटूनही लाभ न मिळाल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.