नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भाडेतत्वाची बोलणी करीत एकाने रिसोर्ट दुरूस्ती व साहित्य खरेदीच्या बहाण्याने तब्बल ३६ लाखांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी संशयितास अटक केली आहे.
प्रमोद वसंत कुटे (३९ रा.युनिक रेसि.मोदकेश्वर कॉलनी,बापू बंगल्याजवळ इंदिरानगर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत हितेश राजकुमार अच्छरा (रा.सहदेवनगर,गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित कुटे व तक्रारदार अच्छरा यांच्यात .२०२२ मध्ये भेट झाली होती. यावेळी कुटे याने आपले स्टोन वॉटर रिसोर्ट भाडे तत्वावर द्यायचे असल्याची बतावणी केली होती. यावेळी अच्छरा यांनी रिसोर्ट भाडेतत्वावर घेण्यास संमती दर्शविल्याने मे महिन्यात दोघांमध्ये बोलणी झाली होती. ठरल्यानुसार कुटे यांनी रिसोर्टची दुरूस्ती आणि साहित्य खरेदीची ग्वाही दिल्याने त्यास वेळोवेळी ३६ लाख रूपये अदा करण्यात आले होते.
मात्र संशयिताने रिसोर्टचा ताबा दिला नव्हता. तब्बल अडिच वर्ष उलटूनही संशयिताने रिसोर्ट चालविण्यास दिले नाही तसेच पैसेही परत केले नाही त्यामुळे अच्छरा यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक फुंदे करीत आहेत.