पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेल्याने रस्ता खचलेला आहे; नागरिकांची सुरक्षितता तसेच दुर्घटना टाळण्याकरीता आजपासून ५ ऑगस्टपर्यंत सदरचा रस्ता बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफ वरील साखळी क्र.६१/६५० ते ६१/६८० दरम्यान रस्त्याला एका बाजूने अतिवृष्टीमुळे तडा गेला असून रस्ता खचलेला आहे. तसेच सदरचे ठिकाण हे ताम्हिणी घाट वन परिसर क्षेत्रात येते. रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे कामे सुरू असून वाहतूक सुरक्षितेच्यादृष्टीने उपाययोजनाही करण्यात येत आहेत. तथापि पुढील काही दिवसात अतिवृष्टीमुळे हा रस्ता खचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या महामार्गावरुन नियमित वाहतूक ठेवणे धोकादायक आहे तसेच शनिवार व रविवारी ताम्हिणी घाट परिसर क्षेत्रात पर्यटकांची गर्दी लक्षात घेवून राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ रस्ता बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.