नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हद्दपारीची कारवाई केलेली असतांना पूर्व परवानगी न घेता राजरोसपणे शहरात वावरणा-या दोघा तडिपारांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. वेगवेगळया भागात दोघे मिळून आले असून याप्रकरणी भद्रकाली व पंचवटी पोलीस ठाण्यात हद्दपार आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विकी शांताराम जावरे (२१ रा.भिमशक्तीनगर आगरटाकळी) व समाधान सुरेश वाघ (२८ रा. मुंजोबा चौक,फुलेनगर पंचवटी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपारांची नावे आहेत. वेगवेगळया भागात राहणारे जावरे व वाघ यांच्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलीसांनी त्यांच्या विरोधात अनुक्रमे एक व दोन वर्षासाठी हद्दपारीची कारवाई केली आहे.
शहर आणि जिल्ह्यातून दोघांना तडिपार करण्यात आलेले असतांना त्यांचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसांना लमिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.३१) दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. जावरे काठे गल्ली परिसरातील टाकळी रोडवर असलेल्या अनुसयानगर भागात तर वाघ दिंडोरीरोडवरील पाटाजवळील वज्रेश्वरी मंदिर परिसरात भद्रकाली आणि पंचवटी पोलीसांनी केली. याप्रकरणी भद्रकालीचे हवालदार अविनाश जुंद्रे व पंचवटीचे अंमलदार कुणाल पचलोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार साळुंखे व शिंदे करीत आहेत.