इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पॅरीस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत कांस्यपदक मिळवणा-या स्वप्नील कुसाळे बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी प्रशिक्षक दिपाली देशपांडे, विश्वजीत शिंदे यांच्याबरोबरही ते बोलले.
शाब्बास स्वप्नील, तुझ्या कांस्य पदकामुळे महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. तुझी कामगिरी महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. तू आमचा अभिमान आहेस,” या शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमबाज स्वप्नील कुसाळेचे अभिनंदन केले. तसेच या कामगिरीसाठी स्वप्नीलला एक कोटी रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, असे जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांनी दिल्या अशा शुभेच्छा
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक असे पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झाले. तब्बल ७२ वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवले आहे. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबिय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे, या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने अभिनंदन, असे नमूद करून मुख्यमंत्र्यानी यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. तसेच त्याला स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.