नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाशिक पोलीस दलासाठी 62 चारचाकी वाहन तर 48 दुचाकी वाहनांचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले.
पोलीस आयुक्त कार्यालयात आज या वाहनांना पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत व सोयिस्कर होणेकरीता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नाशिक शहर पोलिस आयुक्त कार्यालयास 67 लाख 25 हजार रुपये निधीतून 62 चारचाकी वाहने व 48 दुचाकी वाहने प्रदान करण्यात आली. या वाहनांच्या माध्यमातून नाशिक शहर पोलिस दल अधिक बळकट होणार असून, शहरातील नागरिकांना या वाहनांच्या माध्यमातून सुरक्षित वातावरण निर्माण होईल. त्याचप्रमाणे दामिनी पथकच्या माध्यमातून महिला युवतींना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. शहरातील गुंडगिरी तसेच दहशत असेल ती मोडीत काढावी तसचे येणाऱ्या काळात शहरात शांतता राहण्यासाठी पोलिसांनी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिले.
नाशिक शहर आस्थापनेवर कायदा व सुव्यवस्था सुरळीत व सोयिस्कर होणेकरीता शहर वाहतुक विभाग, नाशिक शहर येथे गर्दी व रहदारी नियंत्रित करणे करीता नवीन 300 नग बॅरिकेट्स देखील जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आले आहेत. येणाऱ्या काळातील निवडणूक कालावधीत व आगामी सिंहस्थ कुंभमेळासाठी या वाहने व बॅरिकेटस् चा मोठा फायदा होणार आहे.
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत खरेदी करण्यात आलेली वाहने….
•चारचाकी वाहन – स्कॉर्पिओ -10, बोलेरो – 40, बोलेरो न्युओ – 8, इनोव्हा -2,
थार – 1, एक्सयुव्ही 700 – 1,
•दुचाकी वाहन – ज्युपिटर – २५, हिरो एक्सट्रिम – 20, टीव्हीएस अपाची – 3,
•बॅरिकेट्स – 300 नग