नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल पंधरवड्याच्या माध्यमातून महसूल पंधरवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. यासोबतच शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे मोहीमस्तरावर निकाली काढून पात्र लाभार्थ्यांना न्याय द्यावा, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील नियोजन भवन येथे महसूल दिन व महसूल पंधरवड्याच्या शुभारंभ प्रसंगी पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपविभागीय अधिकारी तथा महसूल पंधरवड्याच्या नोडल अधिकारी हेमांगी पाटील यांच्यासह महसूल यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले की, महसूल पंधरवड्याच्या कालावधीत शासनाच्या विविध जनकल्याण योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी मोहिमस्तरावर नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीसाठी त्यांना जातीचे दाखले हे शाळा व महाविद्यालयांच्या पातळीवर देण्यात यावे. आदिवासी बांधव कागदपत्रांच्या अभावी शासनाच्या योजनांपासून वंचित राहणार नाहीत याबाबत महसूल यंत्रणेने योग्य ते नियोजन करावे. ज्या योजनांचे अनुदान उपलब्ध झाले आहे, त्या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर अनुदान या कालावधीत वर्ग करण्यात यावेत. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ जास्तीत जास्त बहिणींना मिळेल, यासाठी देखील प्रयत्नपूर्वक कार्यवाही करण्याच्या सूचना ही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.
तलाठी हे महसूल यंत्रणेचा ग्रामीण भागात काम करणारा महत्वाचा व जबाबदार घटक आहे. त्यामुळे नवनियुक्त तलाठ्यांनी त्यांची जबाबदारी निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडावी, असे सांगून या कार्यक्रमात ज्या उमेदवारांना तलाठी पदाच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले त्यांना पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शुभेच्छा दिल्या.
विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम म्हणाले, महसूल यंत्रणेच्या कामाच्या व्याप्तीसोबतच त्यातील आव्हाने देखील वाढत आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी व कामाचा निपटारा जलदगतीने होण्या करीता 7/12 संगणकीकरण, ई ऑफीस प्रणाली यासारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग होतांना दिसत आहे. महसूल पंधरवड्याच्या निमित्ताने अधिकप्रमाणात शासनाच्या योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहचेल यादृष्टिने काम करावे, असे आवाहन देखील विभागीय आयुक्त श्री. गेडाम यांनी केले.
महसूल दिन व महसूल पंधरवड्याचा शुभारंभ कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गेल्या वष्रभरात महसूल यंत्रणेकडून करण्यात आलेल्या कामांची थेाडक्यात माहिती दिली. तसेच निवडणूक कालावधीमध्ये तालुकास्तरावर करण्यात आलेल्या कामांची चित्रफीत देखील यावेळी दाखवण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पंधरवड्याची सुरुवात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजने सुरुवात करण्यात येवून पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पाच बहिणींना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच निवडणूक कालावधीत उत्कृष्ट काम केलेले नोडल अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा सूचना अधिकारी संजय गंजेवार व सुनिता जराड यांना प्रशस्तीपत्रक देवून त्यांचा प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला. यावेळी इगतपुरी तहसिलदार यांना चारचाकी वाहनाची चावी पालकमंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
असा राबविण्यात येणार महसूल पंधरवाडा-2024…..
1 ऑगस्ट : “महसूल दिन साजरा करणे व महसूल पंधरवाडा शुभारंभ” ” मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना”
2 ऑगस्ट : “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना”
3 ऑगस्ट : “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना “
4 ऑगस्ट : “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय “
5 व 6 ऑगस्ट : “कृषी मार्गदर्शन कार्यक्रम” कृषी मार्गदर्शन कार्यक्रम”
7 ऑगस्ट : “युवा संवाद”
8 ऑगस्ट : “महसूल – जन संवाद”
9 ऑगस्ट : महसूल ई-प्रणाली “
10 ऑगस्ट : ” सैनिक हो तुमच्यासाठी “
11 ऑगस्ट : “आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन “
12 ऑगस्ट : “एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा”
13 ऑगस्ट : ” महसूल अधिकारी/कर्मचारी” यांचे प्रशिक्षण
14 ऑगस्ट : “महसूल पंधरवाडा वार्तालाप “
15 ऑगस्ट : “महसूल संवर्गातील कार्यरत / सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी / कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल पंधरवाडा सांगता समारंभ”