नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवरील अवधुतवाडी भागात जुन्या वादाची कुरापत काढून दोघांनी भाऊ बहिणीस घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत महिलेचा विनयभंग करीत भावास जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून, पोलीसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी उर्फ बाळा उत्तम निपळुंगे (२५ रा.गल्ली नं.१ म्हाडा बिल्डींग समोर सम्राटनगर,अवधुतवाडी) व प्रकाश उर्फ बुट्या सुनिल गायकवाड (२० रा.म्हाडा बिल्डीग,पंचवटी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अवधुतवाडी येथील २८ वर्षीय पीडित महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडितेचा भाऊ बुधवारी (दि.३१) सकाळी महिलेच्या घरासमोर गल्लीत उभा असतांना ही घटना घडली.
संशयित दोघांनी त्यास गाठून जुन्या भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ केली. यावेळी भावाने बहिणीच्या घराचा आधार घेतला असता संशयितांनी महिलेच्या घरात शिरून तोडफोड करीत भाऊ आणि बहिणीस लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी महिलेचा विनयभंग करीत भावास जीवे मारण्याची धमकी देत भामट्यांनी धुम ठोकली होती. पोलीसात याबाबत तक्रार प्राप्त होताच दोघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून अधिक तपास उपनिरीक्षक नेमाणे करीत आहेत.