इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईः खंडणीसाठी रिलायन्स इंडस्ट्रिजचे मालक मुकेश अंबानी यांना वारंवार ई-मेल करून धमकी दिल्याच्या आरोपावरून दोन महाविद्यालयीन युवकांना अटक करण्यात आली. खोडसाळपणे हे कृत्य केले; परंतु त्याचा परिणाम आता त्यांना जेलची हवा खावी लागली आहे. त्यातील एक गुजरातचा तर एक तेलंगणाचा आहे.
अटक करण्यात आलेल्यांत राजवीर खंत (वय२१) हा मुख्य आरोपी आहे. त्याने २७ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन वापरून ShadabKhan@fencemail.com या ईमेल आयडीवरून मुकेश अंबानी यांना पाच मेल पाठवले. खंत याने सुरुवातीला २० कोटी रुपयांची मागणी केली आणि नंतर उद्योगपतीने त्याच्या मेलला प्रतिसाद न दिल्याने मागणी वाढवून ४०० कोटी रुपये केली. दुसरा तरुण तेलंगणातील गणेश आर वनपारधी (१९) असे आहे. त्याने मीडियामधील धमकीच्या मेलचे वृत्त वाचून एक मेल पाठवला. या प्रकरणातील सहावा धमकीचा मेल त्याच्या ईमेल आयडीवरून आल्याचे पोलिसांनी सांगितले. याने धमकीचा मेल करत ५०० कोटींची मागणी केली. वनपारधीला कोर्टात हजर केले असता त्याला आठ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. खंतला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली, तर वनपारधीला गावदेवी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखेने खंत यांचा गुन्ह्यात वापरलेला डेस्कटॉप आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. खंतला फाजील आत्मविश्वास नडला. त्याने तपास यंत्रणांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळविण्यासाठी त्याने डार्क वेबवर फिरून ‘शादाब खान’ नावाने आयडी तयार करण्यापूर्वी जवळपास एक आठवडा किमान ६५० वेबसाइट शोधल्या होत्या. त्याच्या नकळत त्याने सोडलेल्या डिजिटल फूटप्रिंटच्या मदतीने त्याचा मागोवा घेण्यात आला. धमक्याचे ई-मेल पाठवण्यासाठी प्रोटॉन मेल (एंड-टू-एंड एनक्रिप्टेड ईमेल सेवा आणि मेलफेन्स) सुरक्षित आणि एनक्रिप्टेड ईमेल सेवा वापरला होता. त्याने बेल्जियममधील आयपी पत्ता दर्शविला होता. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने ३ सायबर पोलिस युनिट्स आणि सेंट्रल इंटेलिजेंस युनिटमधील निवडक अधिकाऱ्यांच्या मदतीने मेलच्या व्हीपीएन तपशीलांची तपासणी करून नंतर कारवाई केली.