इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केरळमध्ये वायनाड भागात कोसळलेल्या भूस्खलनाच्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय हवाई सेनेने (आयएएफ) सर्वप्रथम प्रतिसाद देत प्रभावित भागात बचाव तसेच मदतकार्य सुरु केले. एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य प्रशासनासह इतर अनेक संबंधित संस्थांशी साधलेल्या समन्वयासह हवाई दलाने ३० जुलै रोजी पहाटे मदतकार्याला सुरुवात केली.
हवाई मार्गाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा तसेच प्रभावित व्यक्तींना सुखरुप बाहेर काढून योग्य स्थळी हलवण्यात हवाई दलाच्या वाहतूक विमानांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.हवाई दलाच्या सी-17 प्रकारच्या विमानांनी बॅली ब्रिज, श्वानपथक, औषधे तसेच बचावकार्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या इतर अत्यावश्यक साधनांसह सुमारे ५३ टन वजनाचे महत्त्वाचे सामान घटनास्थळी पोहोचवले आहे. त्याशिवाय, मदत साहित्य तसेच मदतकार्य करणाऱ्या व्यक्तींची ने-आण करण्यासाठी हवाई दलाच्या एएन-32 आणि सी-130 या विमानांचा वापर करण्यात येत आहे. समग्रपणे विचार करता, भारतीय हवाई दलाच्या या विमानांनी संकटग्रस्त स्थळापासून बचाव पथके तसेच विस्थापित रहिवाशांसह २०० हून अधिक व्यक्तींच्या वाहतुकीची सुलभ सोय उपलब्ध करून दिली. भूस्खलन झालेल्या भागातील हवामानाच्या आव्हानात्मक परिस्थितीने हवाई वाहतुकीत अडचणी निर्माण होत असताना देखील भारतीय हवाई दल एचएडीआर अर्थात मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्य हाती घेण्यासाठी योग्य वेळेचा उपयोग करून घेत आहे.
आयएएफने या मदतकार्यासाठी विविध हेलिकॉप्टर्सचे पथक नेमले आहे. एचएडीआर विषयक कार्ये हाती घेण्यासाठी नेमलेल्या पथकात एमआय-१७ आणि प्रगत आणि हलक्या वजनाची ध्रुव हेलिकॉप्टर्स (एएलएच)यांचा समावेश करण्यात आला आहे. संकटग्रस्त परिसरात सर्वत्र वाईट हवामानाची परिस्थिती असूनही, आयएएफची विमानांनी तेथे अडकून पडलेल्या लोकांना जवळच्या आरोग्य सुविधा केंद्रांमध्ये तसेच इतरत्र सुरक्षित स्थळी हलवण्याचे तसेच अत्यावश्यक सामानाचा पुरवठा करण्याचे कार्य ३१ जुलै रोजी संध्याकाळी उशिरापर्यंत अखंडितपणे केले. या भागात बचावकार्य अजूनही सुरु असून, हवाई दलाच्या या हेलिकॉप्टर्सनी आपत्ती प्रभावित भागातून मोठ्या प्रमाणात लोकांना बाहेर काढून त्यांच्या सुरक्षित आणि त्वरित वाहतुकीची सुनिश्चिती केली आहे.