नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भूतबाधा झालेल्या महिलेच्या अंगातील भूत उतरवण्याच्या बहाण्याने तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भोंदूबाबा विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात नुकताच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. मात्र त्यावर अद्याप जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम लावले नाहीत म्हणून महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्याबाबत चर्चा केली. सदर भोंदूबाबाचा सखोल तपास करून भोंदूविरोधात जादूटोणाविरोधी कायद्याची कलमं लावावीत, असे विनंती पत्र दिले.सदर भोंदूबाबाला पोलीस कोठडी मिळाली असून सखोल तपास चालू आहे. जादूटोणा, मंत्र- तंत्र असं काही अंधश्रद्धा युक्त प्रकार, आक्षेपार्ह साहित्य आढळल्यास सदर भोंदूबाबवर जादूटोणाविरोधी कायद्याची कलमं निश्चित लावली जातील, असे आश्वासन श्री शरमाळे यांनी कार्यकर्त्यांना दिले.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक भागात सामान्यांच्या अज्ञानाचा, अंधश्रद्धांचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणात भोंदूगिरी चालते, यावर एकमत झाले .म्हणून महाराष्ट्र अंनिसच्या विनंतीवरून इंदिरानगर पोलीस ठाणे आणि महाराष्ट्र अंनिसच्या संयुक्त विद्यमाने भोंदूगिरी शून्यावर हे प्रबोधनपर अभियान राबवण्याचे ठरले. त्यामध्ये परिसरातील शाळा- महाविद्यालय तसेच झोपडपट्टी सह विविध भागात वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार प्रात्यक्षिक सादरीकरण, जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा यांचे प्रबोधन करण्याचे ठरले.
यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर .गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे ,जिल्हा बुवाबाजी विरोधी संघर्ष सचिव महेंद्र दातरंगे उपस्थित होते.