इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे १ कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात १ रुपया जमा करणार आहोत. हा १ रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
या योजनेबाबत अनेकवेळा नियमांबाबतही वेगवेगळी माहिती प्रसिध्दी होते. त्यामुळे अनेकांचा गैरसमज होता. आता मंत्री तटकरे यांनी बँक खात्याबाबतही ही माहिती दिली असून त्याचे कारणही सांगितले आहे.
मराठी अर्जाबद्दल चुकीची माहिती
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या परिपत्रकात मराठी भाषेमधील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे. या संदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटी मुळे अर्ज रद्द करणार नसल्याची ग्वाही मंत्री तटकरे यांनी दिली आहे.