इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना एकतर देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील असे सांगितल्यानंतर आता भाजपकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याविरोधात षडयंत्र रचून त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी जंगजंग पछाडलं. पण मायबाप जनतेच्या आशीर्वादानं उद्धव ठाकरे देवेंद्रजींना तुरुंगात टाकू शकले नाहीत.
त्यांनी पुढे म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तर टीका करण्याची उध्दव ठाकरे यांची पात्रताही नाही, त्यामुळे घाम फोडण्याची त्यांची भाषा हास्यास्पद आहे. उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसला, तुरुंगात टाकण्यासाठी प्रयत्न केला. आता त्यांना संपविण्याची अहंकारी भाषा करताहेत, पण त्यांनी लक्षात ठेवावं, तुमचा हाच अहंकार जनता जनार्दन संपविल्याशिवाय राहणार नाही.
देवेंद्रजींच्या पाठीशी जनता आहे, परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. त्यांचं राजकारण संपविण्यासाठी उद्धव ठाकरे यांना शंभर जन्म घ्यावे लागतील.