नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मखमलाबाद आणि वाघाडी भागात मंगळवारी (दि.३०) छापे टाकत पोलीसांनी उघड्यावर जुगार खेळणा-या सहा जणांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत रोकडसह जुगाराचे साहित्य पोलीसांनी जप्त केले असून याप्रकरणी म्हसरूळ आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मखमलाबाद येथील बस स्टॅण्ड परिसरात काही जण जुगार खेळत असल्याची माहिती म्हसरूळ पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पथकाने धाव घेतली असता प्रविण जयराम अहिरे (रा.गितगंगा सोसा.एरिगेशन कॉलनी,म.बाद) व रामभाऊ पुडलिक धोत्रे हे दोघे सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला स्व:ताच्या फायद्यासाठी अंक अकड्यावर पैसे लावून कल्याण बाजार नावाचा मटका जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयितांच्या ताब्यातून १ हजार २३० रूपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. याप्रकरणी अंमलदार पंकज महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुसरा छापा वाघाडी भागात टाकण्यात आला. वाघाडी नदी काठी काही युवक जुगार खेळत असल्याची माहिती पंचवटी पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाव घेत छापा टाकला असता मंगेश किशन जाधव (रा.बुरूडवाडी,वाघाडी),अविनाश संभाजी काळे (रा.समाज मंदिराजवळ,वाघाडी),नागेश रमेश पाटील (रा.संजयनगर,वाघाडी) व अंकुश पांडूरंग भुजाड (रा.वाल्मिकनगर,वाघाडी) आदी पत्र्याच्या शेडमध्ये पत्यांच्या कॅटवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना मिळून आले. संशयिताच्या ताब्यातून ४ हजार ३५० रूपयांची रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी अंमलदार नितीन पवार यांनी दिेलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार सागर कुलकर्णी करीत आहेत.