इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मराठा आरक्षणासाठीचे दुसऱ्या टप्प्यातील उपोषण मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रुग्णालयात उपचार घेतले. आता दोन महिन्याची मुदत त्यांनी सरकारला दिली आहे. या काळात मराठा आरक्षणासाठी जनजागृती आणि पुढच्या लढ्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी जरांगे पाटील आता मैदानात उतरले आहेत.
जरांगे पाटील यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की आपली प्रकृती आता चांगली आहे. डॉक्टरांनी मला ठणठणीत बरे केले आहे. आता आरक्षण मिळाल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. मराठा समाजावर आतापर्यंत खूप अन्याय झाला आहे; परंतु आता चांगले दिवस आले आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरू राहणार आहे.
जरांगे पाटील यांनी राज्यातील प्रत्येक गावात एक डिसेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला. आपण पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. महाराष्ट्रातील ते दौरा कधीपासून सुरू होणार ते उद्या किंवा परवा जाहीर करणार आहेत. पहिल्या दौऱ्याच्या वेळी ज्या भागात जाता आले नाही, त्या भागाचा दौरा करणार असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.
मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या वेळी मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्याबद्दल खेद व्यक्त करून, आपले आंदोलन शांततेचे आणि लोकशाही मार्गाचे आहे. उद्रेक होईल, असे काही करु नका. कोणी आत्महत्या करु नका. २४ डिसेंबरपर्यंत आपणास खांद्याला खांदा लावून लढायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.