नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात तोतया पोलीस पुन्हा सक्रिय झाले असून नारायण बापू नगर भागात पादचारी वृध्दाची वाट अडवित भामट्यांनी सोनसाखळी हातोहात लांबविली. या घटनेत मदतीचा बहाणा करून भामट्यांनी ३० हजार रूपये किमतीची सोन्याची चैन हातचलाखीनी पळविली असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जयंत पंढरीनाथ शहा (६७ रा.लोखंडे मळा,जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शहा सोमवारी (दि.२९) सायंकाळी पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. जेलरोड कडून ते आपल्या घराकडे रस्त्याने पायी जात असतांना नारायण बापू नगर येथील एमएसईबी कॉलनीजवळ त्यांना दोघा भामट्यांनी गाठले.
यावेळी त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करीत वृध्दास अंगावरील दागिणे काढून ठेवण्याचा सल्ला दिला. यावेळी गळ््यातील सोनसाखळी रूमालात बांधून ठेवण्यासाठी मदत करीत भामट्यांनी सोन्याची चैन हातोहात लाबंविली. ही बाब शहा आपल्या घरी पोहचल्यानंतर उघडकीस आली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.