नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खाद्यपदार्थाच्या किमतीवरून दुकानात तोडफोड करणा-या युवकाच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. संशयिताचे चार साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ही घटना काठेगल्लीतील बनकर चौकात घडली होती. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रिश किरण शिंदे (१९ रा.५४ कॉर्टर्स,एनएमसी बिल्डींग नानावली, टाकळीरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. सखाराम चौधरी (रा.काठेगल्ली) यांनी फिर्याद दिली होती. चौधरी यांचे बनकर चौकात सुखसागर नावाचे स्विटसचे दुकान असून सोमवारी (दि.२९) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली होती.
संशयितासह त्याचे चार साथीदार खाद्यपदार्थाच्या खरेदीसाठी दुकानात आले होते. यावेळी खरेदीच्या वेळी किमतीवरून वाद घालत दुकानात तोडफोड केली होती. या घटनेत दुकानाबाहेर ठेवलेले दोन फ्रिजच्या तसेच दुकानाची काच फोडून टोळक्याने धुम ठोकली होती. याबाबत गुन्हा दाखल करीत पोलीसांनी शिंदेला हुडकून काढले असून त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सविता गवांदे करीत आहेत.
……..