नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 1386 किमी लांबीच्या दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे बांधकाम हाती घेतले असून, यामध्ये 53 पॅकेजमध्ये स्पर्स म्हणजेच इतर महत्वाच्या मार्गाना जोडणाऱ्या मार्गिकांचा समावेश आहे. जून 2024 पर्यंत, एकूण 26 पॅकेज पूर्ण झाले आहेत. 82% काम पूर्ण झाले असून यामध्ये एकूण 1136 किमी लांबीचे बांधकाम करण्यात आले आहे.
हा प्रकल्प पूर्ण करण्याची सुधारित निर्धारित मुदत ऑक्टोबर 2025 ही आहे. हा कॉरिडॉर दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रमुख आर्थिक केंद्रांना कनेक्टिव्हिटी प्रदान करेल. डीपीआर अनुसार, हा द्रुतगती महामार्ग कार्यान्वित झाल्यावर दिल्ली आणि जेएनपीटी दरम्यानचे अंतर सुमारे 180 किमी ने कमी होईल, तसेच महामार्गाने जोडलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी लागणारा वेळ जवळजवळ निम्म्यावर येईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.