इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरचे वाढते अपघात रोखण्यासाठी आता उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात २०६ किलोमीटर अंतरात ऐंशी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा वॉच असणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर दिला आहे. पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा आणि जालना या जिल्ह्यांत ८० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. हे कॅमेरे कोठे बसवायचे, याचे लोकेशनही अंतिम करण्यात आले आहे. हे कॅमेरे ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’अंतर्गत (आयटीएमएस) बसवले जाणार आहेत. त्यांचे कार्यान्वयन ऑप्टिकल फायबरद्वारे करण्यात येणार आहे. पुढच्या एक वर्षात हे कॅमेरे बसविले जातील. हे काम सुरू करण्याची तारीख अद्याप निश्चित केलेली नाही; परंतु लवकरच काम सुरू होईल.
मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्गावर ‘आयटीएमएस’ बसवण्यात येणार आहे. त्यासाठी एक हजार चारशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. लेन कटिंग, ओव्हरस्पीड, टोलनाक्यांवरील एन्ट्री, एक्झिट आणि टोलच्या वसुलीवर सीसीटीव्ही कॅमेरांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. हे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी लेन कटिंग, ओव्हर स्पीडच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी स्पीड गनऐवजी सीसीटीव्ही बसवा, असे आदेश ‘एमएसआरडीसी’ला दिले आहेत. ही यंत्रणा बसवल्यानंतर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंडाची पावती घरपोच पाठवण्यात येणार आहे.