नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गाव बुऱ्हाणपूर. कुटुंबातील बहुतांश सदस्यांनी कधीही दवाखान्याची पायरीदेखील चढलेली नसेल. कुटुंब सुशिक्षित पण परिस्थिती बेताचीच. मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव साजरा केला गेला; चांगले शिक्षण देऊन खूप मोठं बनवायचे असा दृढ निश्चय झालेला असतानाच अचानक तिला दुर्मिळ पण अतिशय घातक समजला जाणारा कर्करोग निष्पन्न झाला. हा आजार खूप भयंकर आहे, जास्तीत जास्त ३-४ महिन्यात अशा आजाराचे रुग्ण दगावण्याची शक्यता असते असे डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घरातील सर्वच अक्षरश: चिनभिन झाले. ही कथा आहे, मध्यप्रदेशमधील बुऱ्हाणपूर येथील १७ वर्षीय शितलची (नाव बदललेले). जिचा मागील काही वर्षांचा प्रवास, तिला झालेला त्रास आणि या आजारावर तिने मिळवलेले यश हे सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरणार आहे.
कर्करोग अर्थात कॅन्सरवरील अत्यंत अवघड समजली जाणारी उपचारपद्धती असलेली बोन मॅरो ट्रान्सप्लांट (निरोगी अस्थिमज्जांचे प्रत्यारोपण) शस्त्रक्रिया नुकतीच एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये यशस्वी पार पडली. बुऱ्हाणपूर येथील शितल (वय १७, नाव बदललेले) या मुलीवर ही शस्रक्रिया झाली. याबाबतची माहिती एसएमबीटी हॉस्पिटलचे रक्तविकार कर्करोग तज्ञ डॉ. गिरीश बदरखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी अधिष्ठाता डॉ मीनल मोहगावकर, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांची उपस्थिती होती.
अधिक माहिती अशी की, शितल (नाव बदललेले) हिला २०२१ साली हॉजस्किन्स लिम्फोमा या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. उपचारासाठी ते अनेक ठिकाणी गेले; सर्वत्र उपचारासाठी जो खर्च सांगण्यात आला तो न परवडणारा होता. शिवाय, हा आजार खूप घातक आणि प्रोग्रेसिव्ह असल्याचे सांगत रुग्ण बरा होण्याची शाश्वती मिळत नव्हती. यानंतर एसएमबीटी हॉस्पिटलचे रक्तविकार कर्करोगतज्ञ डॉ बदरखे यांच्याकडे त्यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला किमोथेरपी घेऊन तिला आराम मिळाला मात्र, चार वेळा हा कर्करोग उलटून आल्याने बोन मॅरो ट्रान्सप्लांट केल्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यानंतर गेल्या महिन्यापासून तिच्यावर एसएमबीटीत उपचार सुरु होते. आज ती पूर्णपणे बरी आहे, तिच्या शरीरातील पेशी वाढल्या आहेत. हळूहळू वजन वाढण्यास सूरूवात होईल. पुढील सहा महिन्यांनी ती पूर्णपणे बरी होऊन तिच्या मूळ अधिवासात दाखल होणार आहे. नियमित उपचार आणि रुग्णाने दिलेला प्रतिसाद यामुळे या रुग्णावर अथक मेहनत घेतल्यानंतर डॉ बदरखे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने बोन मॅरो ट्रान्सप्लांट यशस्वी केला. या उपचारपद्धतीचा वापर हा रक्ताचा कर्करोग अथवा रक्ताच्या इतर आजारांवर होऊ शकतो. यामध्ये सदोष काम करणाऱ्या रोगग्रस्त अस्थिमज्जा पूर्णपणे निकामी करून त्याजागी निरोगी अस्थिमज्जांचे प्रत्यारोपण केले जाते. ही उपचारपद्धती एक महिनाभर चालते अशी माहिती डॉ बदरखे यांनी दिली.
सर्वात प्राणघातक कर्करोगांमध्ये रक्ताच्या कर्करोगाचा सहावा क्रमांक आहे. रक्ताच्या कर्करोगाचे तीन मुख्य प्रकार असून ल्युकेमिया, लिम्फोमा आणि मायेलोमा अशी त्यांचे नावे आहेत. दरवर्षी देशभरात ल्युकेमियाचे ३५ हजार नवे रुग्ण, लिम्फोमाचे ३२ हजार नवे रुग्ण तर मायेलोमाचे ७ हजार नवे रुग्ण आढळतात. यासोबतच रक्ताच्या कर्करोगामुळे दरवर्षी सुमारे ५० हजार रुग्णांचा मृत्यू होतो असे डॉ बदरखे यांनी सांगितले. दरम्यान, एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी जीवनदायी ठरले आहे.
टाटा मेमोरियल हॉस्पिटलसोबत तांत्रिक मार्गदर्शनाचा करार झालेला असून अद्ययावत कर्करोग उपचार आणि शस्रक्रिया याठिकाणी होत आहेत. अत्याधुनिक उपचारपद्धतीला महत्त्व देत सुसज्ज युनिट याठिकाणी कार्यरत आहे. कॅन्सरवरील अत्याधुनिक उपचार करताना रक्तातील कॅन्सर बरा करणे आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट करणे ही अत्यंत आव्हानात्मक उपचारपद्धती आहे. या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णाला याआधी मुंबई, पुणे, बंगलोर या ठिकाणी जावे लागत होते. मात्र, एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारपद्धती यशस्वीपणे करण्यात येत आहे.
कमीत कमी खर्चात उपचार
आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही रुग्ण रुग्णालयातून परत जाऊ नये या उद्देशाने एसएमबीटी हॉस्पिटलची वाटचाल सुरु आहे. कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची उपचार सुविधा साकारण्यात आली आहे. बोन मॅरो ट्रान्सप्लांट या अद्ययावत उपचार पद्धतीसाठी सहा सुसज्ज बेड तयार करण्यात आले आहेत. रुग्णाची आर्थिक परिस्थिती पाहता या रुग्णावर कमीत कमी भार कसा येईल असे प्रयत्न करण्यात आले. यासाठी हॉस्पिटलच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक संस्थांची मदतदेखील घेण्यात आली.
डॉ. मीनल मोहगावकर, अधिष्ठाता, एसएमबीटी हॉस्पिटल
नवे जीवन आता सुरु
रक्ताचा कर्करोग प्रचंड वेदनादायी असतो. हा कर्करोग सहसा बरा होणारा नसतो असा अनेकांचा समज आहे, त्यामुळे रुग्ण इच्छाशक्ती गमावून बसलेला असतो. मात्र, सध्याच्या अद्ययावत तंत्रज्ञान आणि वेगवेगळे संशोधन यामुळे आता हा आजार बरा होत आहे. यासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा पर्याय आहे. या मुलीलाही खूप वेदना होत होत्या, मात्र तिने उपचारांना खूप चांगला प्रतिसाद दिला व आज रुग्णाला बरे करण्यात एसएमबीटीच्या टीमला यश आले आहे. तिचे नवे जीवन आता सुरु झाल्याने खूप आनंद होत आहे.
डॉ गिरीश बदरखे, रक्तविकार तज्ञ आणि बीएमटी तज्ञ, एसएमबीटी हॉस्पिटल