इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची प्रीति सूदन यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असून उद्या (ता. १) आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्या पदभार स्वीकारणार आहेत. कर्नाटक केडरच्या १९८३ च्या बॅचच्या आयएएस असलेल्या प्रीति सूदन यांना फक्त आठ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.
प्रीति सूदन कर्नाटकच्या आयएएस अधिकारी असून हरयाणाच्या रहिवाशी आहेत. १९८३ सालच्या बॅचच्या अधिकारी राहिलेल्या सूदन चार वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाल्या आहेत. आपल्या कार्यकाळात केंद्र सरकारच्या अनेक विभागात त्यांनी डॅशिंग कामगिरी केली असून महिला व बालकल्याण विकास मंत्रालयात त्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सचिव, खाद्य व सार्वजनिक वितरण विभाग, आरोग्य विभागाचे सचिवपदही त्यांनी सांभाळले आहे. ऑक्टोबर २०१७ ते जुलै २०२० या काळात त्यांनी कोविड रणनीतीकार म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
सूदन यांनी इंग्रजी विषयात पदवी प्राप्त केली असून एमए, एमफील आणि पीएचडी इकॉनॉमिक्स विषयात केले असून, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ,’ ‘आयुष्यमान भारत योजना’ यांसह राष्ट्रीय आरोग्य आयोग, एलाईड हेल्थ प्रोफेशनल आयोग आणि ई-सिगारेटवर प्रतिबंधन कायदा बनवण्याचे श्रेय त्यांना जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष महेश सोनी यांनी राजीनामा दिल्यानंतर सूदन यांना अध्यक्षपदी जबाबदारी देण्यात आली आहे.