नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चोरीस गेलेल्या मोबाईलच्या माध्यमातून भामट्यांनी एकाच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. फोन पे वरून सुमारे एक लाख रूपये भामट्यांनी परस्पर लांबविले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर तुकाराम भारस्कर (रा.म्हाडा बिल्डींगजवळ,पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भारस्कर गेल्या रविवारी (दि.२८) भाजीपाला खरेदीसाठी पंचवटीतील मार्केट यार्डात गेले होते. भाजीपाला खरेदी करीत असतांना चोरट्यांनी त्यांच्या पॅण्टच्या खिशातील मोबाईल चोरून नेला.
या मोबाईलमधील फोन पे च्या माध्यमातून भामट्यांनी त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारला असून या घटनेत ९९ हजार ९५० रूपयांची रोकड परस्पर काढण्यात आली आहे. अधिक तपास निरीक्षक ज्योती आमणे करीत आहेत.