शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनचा पाठपुरावा
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गोविंदनगर, जुने सिडकोसह प्रभाग २४ मध्ये सुरळीत विद्युत पुरवठ्यासाठी महावितरणने ठोस उपाययोजना हाती घेतली आहे. यासाठी ७ कोटी ४७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनच्या पाठपुराव्याला यश आले आहे. महावितरणने याबाबतचे पत्र दिले आहे. नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जुने सिडको, भुजबळ फार्म, पांगरे मळा, गोविंदनगर, कर्मयोगीनगर, जगतापनगर, कालिका पार्क, तिडकेनगर, बाजीरावनगर, उंटवाडी या भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतो. अनेकदा यामुळे घरामधील विद्युत उपकरणांचेही नुकसान झाले आहे. सततच्या त्रासाने रहिवाशी हैराण झाले आहेत. येथील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने दिला होता. सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या पुढाकाराने महावितरणचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप वट्टमवार यांना लेखी निवेदने देण्यात आली. सतत पाठपुरावा करण्यात आला. या भागाला विद्युत पुरवठा करणारी ३३ केव्ही वाहिनीवरील नादुरुस्त केबल काढून अडीच किलोमीटरची २ कोटी ६१ लाख रुपये खर्चाची नवीन केबल टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नियमित पुरवठा होणार्या उपकेंद्रावरून सुरळीत विद्युत पुरवठा होणार आहे.
या उपकेंद्रावर जास्त भार आला किंवा मोठा बिघाड होवून विद्युत पुरवठा खंडित झाला, तर सातपूर उपकेंद्रातून या भागात विद्युत पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी पावणेदोन किलोमीटरची उपरी वाहिनी टाकण्यात येणार आहे. यासाठी ४ कोटी ८६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव मुंबईतील वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी याबाबतचे पत्र सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख) यांना दिले आहे. बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगिता देशमुख, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, अशोक पाटील, विठ्ठलराव देवरे, शिवाजी मेणे, निलेश ठाकूर, यशवंत जाधव, आनंदा तिडके, निंबा अमृतकर, सतिश मणिआर, दीपक दुट्टे, दिलीप दिवाणे, मनोज पाटील, बन्सीलाल पाटील, अनंत संगमनेरकर, बाळासाहेब देशमुख, दिलीप निकम, मनोज वाणी, हरिष काळे, भारती देशमुख, मीना टकले, वंदना पाटील, रूपाली मुसळे आदींसह रहिवाशांनी महावितरणचे आभार मानले आहे.