इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः केंद्र सरकार लवकरच साखरेचे दर वाढवू शकते. केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी तसेच सूचित केले आहे. साखरेची किमान विक्री किंमत (एमएसपी) वाढविण्याबाबत सरकार येत्या काही दिवसांत निर्णय घेऊ शकते.
‘ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन’ (एआयएसटीए) च्या परिषदेत बोलताना ते म्हणाले, “आम्ही साखरेच्या किमान विक्री किमंत वाढीच्या प्रस्तावावर चर्चा केली. येत्या काही दिवसांत याबाबत निर्णय होईल, अशी आशा आहे.” ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रास्त आणि किफायतशीर किमतीत (एफआरपी) वार्षिक वाढ करूनही साखरेची किमान विक्री किमंत मात्र वाढलेली नाही. २०१९ पासून ती ३१ रुपये प्रति किलो राहिली आहे.
सरकारच्या या निर्णयानंतर मिठाईपासून गोड पदार्थांपर्यंत सर्व काही महाग होऊ शकते. ‘नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज’ सह उद्योग संस्थांनी वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत साखरेला भाव मिळण्यासाठी किमान विक्री मूल्य वाढवण्याची मागणी केली आहे. त्यात किमान ४२ रुपये प्रतिकिलोपर्यंत वाढ करण्याची विनंती करण्यात आली आहे. २०२४-२५ हंगामासाठी (ऑक्टोबर-सप्टेंबर) साखरेचे उत्पादन आशादायक दिसत आहे. आत्तापर्यंत उसाची लागवड ५८ लाख हेक्टरवर गेली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ती ५७ लाख हेक्टर होती.