इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अकोलाः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेले मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार यांचा नंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात मालोकार सहभागी होते.
या घटनेनंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मिटकरींना म्हणाले आपली लायकी काय आपण बोलतो काय …दुर्दैवाने आमच्या २८ वर्षाच्या कार्यकर्त्याला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. यावर अमोल मिटकरी यांनी नीज राजकारण करु नये. ते इतके नीज राजकारणी असतील असे वाटलं नव्हते. ज्यानी भाजपसोबत निवडणूक लढवली ते नंतर शरद पवार साहेबांसोबत गेले, मग तुम्ही सुपारीबाज नाही का असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी विचारला.
उपचार सुरू असतानाच निधन
राज ठाकरे यांच्यावर आ. मिटकरी यांनी सुपारीबाज असा आरोप केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी आ. मिटकरी यांची गाडी फोडली. त्यात मालोकार होते. या राड्यानंतर मालोकार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
१३ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
या प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या १३ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर १२ कार्यकर्ते फरार झाले. मालोकारही त्यात होते; पण त्यांच्या छातीत दुखायला लागल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
कुटुंबीयांची भेट घेणार
मालोकार यांच्या मृत्यूनंतर मपोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. आ. मिटकरी यांच्या घराबाहेरही पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मालोकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर आ. मिटकरी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. आपण लवकरच त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.