नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबवली जाते. या योजनेंतर्गत रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातुन मिळुन त्यांची क्षमतावाढ होणार असून उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध होणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे रहिवासी असलेले 18 ते 35 वयोगटातील रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे व उद्योजक आस्थापनांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नाशिकच्या सहाय्यक आयुक्त अ.ला.तडवी यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
या उपक्रमांतर्गत www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातुन रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करुन देणारे उद्योजक, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था , महामंडळ इत्यादी कार्यालये जोडली जाणार आहेत. नोंदणी झालेल्या उमेदवारांनी त्यांच्या लॉगिनद्वारे संबधित आस्थापनेने अधिसूचित केलेल्या रिक्त पदांकरिता ऑनलाईन ॲप्लाय करावयाचे आहे. किंवा nashikrojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधुन ऑफलाईन नोंदणी फॉर्म उपलब्ध करुन घ्यावा. सदर ऑफलाईन नोंदणी फॉर्म जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातपुर आयटीआय परिसर, त्र्यंबक रोड, नाशिक येथे स्विकारले जाणार आहेत.तसेच शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ इत्यादी कार्यालये यासोबतच विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग, स्टार्टअप्स, विविध आस्थापना त्यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी ऑनलाईन नोंदवावी.
नाशिक जिल्ह्यात शासकीय आणि खाजगी आस्थापनांवर सुमारे १५ हजार कार्य प्रशिक्षणाच्या संधी या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत. तसेच, जिल्ह्यात सद्यस्थितीत शासकीय कार्यालयांची ४३२ रिक्तपदे अधिसूचित झाली असुन याकरिता पदवीधर, पदव्युत्तर, मराठी आणि इंग्रजी टंकलेखन तसेच MSCIT शैक्षणिक अहर्ता धारक उमेदवार पात्र आहेत. तसेच खाजगी आस्थापनांची १ हजार ५६६ रिक्तपदे प्राप्त झाली असुन याकरिता आयटीआय, पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा अशी शैक्षणिक अहर्ता धारक उमेदवार पात्र ठरणार आहेत. सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी हा ६ महिने असून या कालावधीत उमेदवारांना शासनामार्फत बारावी साठी रूपये ६ हजार, आय.टी.आय व पदविका साठी ८ हजार, पदवी व पदव्युत्तर साठी रुपये १० हजार इतके विद्यावेतन देण्यात येणार आहे. सदर विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात डिबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या nashikrojgar@gmail.com या ईमेलवर तसेच 0253-2993321 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.