नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सहकार मंत्रालय,या क्षेत्रातील तांत्रिक आणि व्यवस्थापन शिक्षण आणि प्रशिक्षण देण्यासाठी तसेच सहकारी संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी आणि संलग्न संस्थांच्या जाळ्याद्वारे देशातील सहकारी चळवळ मजबूत करण्यासाठी, राष्ट्रीय स्तरावर सहकार विद्यापीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे.
हा उद्देश साध्य करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित विद्यापीठाची रूपरेषा विकसित करण्यासाठी केंद्रीय मंत्रालये आणि विभाग, राज्य सरकारे, राष्ट्रीय सहकारी आणि संघ, सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था इत्यादींसह विविध भागधारकांशी विस्तृत सल्लामसलत करण्यात आली आहे.आपला खर्च भागवण्यासाठी हे विद्यापीठ स्वयंपूर्ण करण्याचे उद्दिष्ट देखील ठेवण्यात आले आहे.
प्रस्तावित विद्यापीठ सहकार क्षेत्राशी समन्वय साधून काम करेल तसेच यामध्ये शिक्षण आणि प्रशिक्षणासाठी सर्वसमावेशक, एकात्मिक आणि प्रमाणित संरचना असेल जेणेकरून मंत्रालयाने हाती घेतलेल्या सहकार क्षेत्रातील विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाचा स्थिर, पुरेसा आणि दर्जेदार पुरवठा सुनिश्चित होईल.व्यावसायिक मनुष्यबळाचा पुरवठा आणि सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची क्षमता वर्धित करणे यामुळे सहकार क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये मोठे योगदान देण्यास सक्षम होईल अशी अपेक्षा आहे. सहकार मंत्री अमित शहा यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.