नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २ आणि ३ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रपती भवन येथे आयोजित राज्यपालांच्या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही राज्यपालांची पहिली परिषद असेल.
या परिषदेला सर्व राज्यांचे राज्यपाल उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह गृह, कृषी आणि शेतकरी कल्याण; शिक्षण; आदिवासी व्यवहार; माहिती आणि प्रसारण;पर्यावरण, वन आणि हवामान बदल; युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री; नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवालय, गृहमंत्रालय आणि इतर मंत्रालयांचे इतर वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.
परिषदेच्या चर्चा विषय पत्रिकेत तीन फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी; उच्च शिक्षणात सुधारणा आणि विद्यापीठांची मान्यता; आदिवासी क्षेत्र,आकांक्षी जिल्हे आणि ब्लॉक्स आणि सीमावर्ती भाग यासारख्या केंद्रित क्षेत्रांचा विकास; ‘मायभारत’, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ आणि ‘एक वृक्ष माँ के नाम’ आणि नैसर्गिक शेती या मोहिमांमध्ये राज्यपालांची भूमिका;राज्यपालांनी सार्वजनिक संपर्क वाढवणे; आणि राज्यातील विविध केंद्रीय संस्थांमध्ये उत्तम समन्वय साधण्यात राज्यपालांची भूमिका या मुद्द्यांचा समावेश आहे. सहभागी राज्यपाल या मुद्द्यांवर विविध गटांमध्ये विचारविनिमय करतील. परिषदेच्या समारोप सत्रात हे गट राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर सहभागींसमोर सादरीकरण करतील.